(प्रणयकुमार बंडी)
मुंबई : आज मंत्रालयात पणन व राजशिष्टाचार विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांना आमदार किशोर जोर्गेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांबाबत निवेदन दिले.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाची संस्था सीसीआय (Cotton Corporation of India) ची कापूस खरेदी अद्याप सुरू झालेली नाही, अशी खंत आमदार जोर्गेवार यांनी व्यक्त केली.
निवेदनामध्ये तात्काळ कापूस खरेदी सुरू करणे, सोयाबीन खरेदी केंद्रे कार्यान्वित करणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरपाई व दिलासा पॅकेज जाहीर करणे तसेच खासगी व्यापाऱ्यांवरील नियंत्रण यंत्रणा मजबूत करणे अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या.
आमदार जोर्गेवार म्हणाले, “शेतकरी हा आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या हक्काच्या दरासाठी आणि न्याय्य भरपाईसाठी आपण सर्वांनी एकजूट होणे ही काळाची गरज आहे.”
या प्रसंगी विभागीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.




