Friday, July 3, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

अ-हेरनवरगाव–ब्रह्मपुरी मार्गाची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका, नागरिकांकडून चौकशी व तातडीच्या दुरुस्तीची मागणी

ब्रह्मपुरी, चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील अ-हेरनवरगाव ते ब्रह्मपुरी या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांचे हाल होत आहेत. शेतातून ये-जा करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, पावसाळ्यात हा मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे.

या मार्गावरून दररोज दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने, शालेय बस तसेच सायकलवरून शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी प्रवास करतात. मात्र, खड्डे आणि चिखलामुळे वाहन घसरून गंभीर अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे हा मार्ग ब्रह्मपुरी आणि चिमूर या दोन विधानसभा मतदारसंघांच्या हद्दीत येत असल्याने, दोन्ही मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करून सिमेंट काँक्रीटचा दर्जेदार रस्ता बांधण्यात यावा, अशी मागणी भालेश्वर, अ-हेरनवरगाव, पिंपळगाव भोसले परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सुमारे दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच या रस्त्यावर तडे जाऊन तो अनेक ठिकाणी उखडू लागल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय संबंधित कामाचा मंजूर अंदाजपत्रक, खर्च आणि ठेकेदाराची माहिती दर्शविणारा सूचनाफलक अद्यापही लावण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे.

स्थानिकांच्या मते, निकृष्ट दर्जाचे काम आणि पारदर्शकतेचा अभाव पाहता या रस्ते बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News