Saturday, November 14, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

१२ महिन्यांच्या थकीत कोविड प्रोत्साहन भत्त्यासाठी ३२ आशा स्वयंसेविकांचे बेमुदत धरणे आंदोलन; आठव्या दिवशी महिला स्वयंसेविकेची प्रकृती खालावली

कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस आंदोलन, प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र संताप; आणखी किती महिलांची प्रकृती खालावल्यानंतर प्रशासन जागे होणार?

घुग्घुस, चंद्रपूर : येथील ३२ आशा स्वयंसेविकांच्या थकीत कोविड प्रोत्साहन भत्त्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ रोजी आठ दिवस पूर्ण झाले. मात्र, अद्यापही १२ महिन्यांची थकीत रक्कम मिळालेली नसल्याने आशा स्वयंसेविकांचा संघर्ष सुरूच आहे. आपल्या हक्काच्या कष्टाच्या पैशांसाठी या महिला कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस आंदोलनस्थळी बसून न्यायाची मागणी करीत आहेत. मात्र, नगराध्यक्षा, उपाध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या आंदोलनादरम्यान दिनांक ११ नोव्हेंबर रोजी आठव्या दिवशी आशा स्वयंसेविका सुमित्रा गाडगे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी घुग्घुस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्याची गरज असल्याचे सांगितल्याची माहिती आहे. या घटनेमुळे आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.

कोविड महामारीच्या अत्यंत कठीण काळात स्वतःच्या जीवाची आणि आरोग्याची पर्वा न करता घरोघरी जाऊन नागरिकांना आरोग्यसेवा देणाऱ्या याच आशा स्वयंसेविकांना आज स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. घरातील जबाबदाऱ्या, मुलाबाळांची काळजी आणि कौटुंबिक अडचणी बाजूला ठेवून त्या न्यायासाठी संघर्ष करीत आहेत. मात्र, आंदोलनकर्त्या महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतानाही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र दिसत आहे.

आणखी किती महिलांची प्रकृती खालावल्यानंतर जाग येणार?

आंदोलनकर्त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असताना प्रशासन नेमकी कोणत्या घटनेची वाट पाहत आहे? आणखी किती आशा स्वयंसेविकांची प्रकृती खालावल्यानंतर प्रशासन जागे होणार? एखाद्या महिलेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्यानंतरच थकीत रकमेबाबत निर्णय घेतला जाणार आहे का? असे संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत.

नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच संबंधित शासन आणि प्रशासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन १२ महिन्यांची थकीत रक्कम अदा करण्यासाठी त्वरित निर्णय घ्यावा. तसेच आंदोलनस्थळी सहभागी असलेल्या सर्व आशा स्वयंसेविकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारी गांभीर्याने घ्यावी. त्यांच्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, तातडीची उपचार व्यवस्था आणि सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

अनुचित घटना घडल्यास संबंधित अधिकारी जबाबदार!

आंदोलनादरम्यान कोणत्याही आशा स्वयंसेविकेच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचल्यास किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी आणि प्रशासनावर निश्चित करण्यात यावी, असा स्पष्ट इशारा देण्यात येत आहे.

परिस्थितीची पूर्वकल्पना असूनही आवश्यक प्रतिबंधात्मक आणि आरोग्यविषयक उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच पीडित महिला किंवा तिच्या कुटुंबीयांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी.

कोविड काळात जनतेच्या आरोग्यासाठी जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविकांना आज स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी आरोग्य धोक्यात घालून आंदोलन करावे लागत असेल, तर ही केवळ प्रशासनाची उदासीनता नसून व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News