घुग्घुस, चंद्रपूर : भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त घुग्घुस येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात नगरसेवक विवेक बोढे यांनी डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी डॉ. मुखर्जी यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव केला. “एक देशात दोन विधान, दोन प्रधान आणि दोन निशाण चालणार नाही” ही भूमिका घेऊन त्यांनी भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे विवेक बोढे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देणारे प्रखर राष्ट्रभक्त, दूरदृष्टीचे विचारवंत आणि उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांचे राष्ट्रप्रेम, निःस्वार्थ सेवा आणि अखंड भारतावरील अढळ निष्ठा आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे स्मरण करून राष्ट्रसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला स्वीकृत नगरसेवक निरीक्षण तांड्रा, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, भाजपा नेते संजय भोंगळे, बबलू सातपुते, सिनू इसारप, कोमल ठाकरे, मधुकर धांडे, उमेश दडमल, हनुमान खडसे, योगेश घोडके, विक्की चिवंडे, सौरभ घोडके, भारती परते, प्रिया नागभीडकर, खुशबू मेश्राम, जाई आत्राम, नेहा कुम्मरवार, स्नेहा देवतळे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कार्याचा आणि राष्ट्रासाठीच्या योगदानाचा गौरव करण्यात आला तसेच त्यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.




