चंद्रपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती (नवबौद्धांसह) आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय कुटुंबांतील तरुण-तरुणींना अनाठायी खर्च आणि कर्जबाजारीपणाच्या समस्यांपासून वाचवण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत सामूहिक विवाहात सहभागी होणाऱ्या प्रत्येक जोडप्यास ₹२५,००० इतके कन्यादान अनुदान मिळणार आहे. त्याचप्रमाणे विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला प्रत्येक जोडप्याच्या हिशोबाने ₹४,००० इतके अनुदान देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यातील कोणत्याही कलमाचे उल्लंघन केलेले नसावे, ही अट बंधनकारक आहे.
सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्या प्रस्तावासह सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली असून, अधिक माहितीसाठी इच्छुकांनी समाज कल्याण कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.





