चंद्रपूर : डाक विभागाच्या सेवा अधिक अचूक, जलद व ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, ‘IT 2.0’ या आधुनिक संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही प्रणाली 5 ऑगस्ट 2025 पासून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व डाकघरांमध्ये लागू करण्यात येणार आहे.
या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी ‘डेटा ट्रान्स्फर’ प्रक्रिया 4 ऑगस्ट रोजी राबवण्यात येणार आहे. त्यामुळे 4 ऑगस्ट रोजी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व डाकघरातील व्यवहार पूर्णतः बंद राहतील, अशी माहिती वरिष्ठ डाक अधीक्षक एस. रामाकृष्णा यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर, डाक विभागाशी संबंधित तातडीची कामे असलेल्या नागरिकांनी 2 ऑगस्ट 2025 पर्यंत ती पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना अधिक गतिमान, अचूक व पारदर्शक सेवा उपलब्ध होणार असून, डाक व्यवहारात सुधारणा होणार आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी हे बदल करण्यात येत असल्याने नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.





