चंद्रपूर – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार २५ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेसना २५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही कारवाई आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३० (२) (५) व (१८) नुसार करण्यात आली आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. नितीन व्यवहारे यांनी या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचना लक्षात घेऊन सतर्क राहावे, आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर – संपर्क क्रमांक: 07172-250077 येथे संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.





