गरबा नृत्य स्पर्धेत आकर्षक बक्षिसांची मेजवानी!
महिला व युवती गटातील विजेत्यांना फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एलईडी टीव्ही; लकी ड्रॉमध्ये पैठणीसह विविध भेटवस्तू जिंकण्याची संधी
प्रणयकुमार बंडी
घुग्घुस, चंद्रपूर : नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला रंगत आणण्यासाठी घुग्घुस येथील प्रयास सभागृहात ‘दादाचा दांडिया-२०२६’ अंतर्गत भव्य गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, महिला आणि युवतींना आपले नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून नगरसेवक विवेक बोढे, तर अध्यक्षस्थानी विद्या पाल उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून घुग्घुसचे ठाणेदार प्रकाश राऊत, खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका जेसी रॉय, मुख्याध्यापिका क्किना फर्नांडो, शिक्षिका उल्का पित्रे, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री अमोल थेरे आणि नगरसेवक निरीक्षण तांड्रा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महिला व युवती गटांसाठी आकर्षक पारितोषिके
गरबा नृत्य स्पर्धेत महिला गट आणि युवती गट अशा दोन स्वतंत्र गटांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना रेफ्रिजरेटर आणि आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी वॉशिंग मशीन आणि आकर्षक ट्रॉफी, तर तृतीय क्रमांकासाठी एलईडी टीव्ही आणि आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय प्रोत्साहनपर आकर्षक पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

लकी ड्रॉमध्ये पैठणीसह विविध भेटवस्तू
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे लकी ड्रॉ. यामध्ये दोन पैठणी साड्या, एक मिक्सर, एक मोबाईल, १० गिफ्ट सेट, १० हॉटपॉट आणि १० टिफिन यांचा समावेश आहे.
गरबा नृत्य, सांस्कृतिक उत्साह आणि आकर्षक पारितोषिकांमुळे ‘दादाचा दांडिया-२०२६’ हा कार्यक्रम रंगतदार ठरण्याची अपेक्षा आहे. महिला व युवतींच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाकडे घुग्घुस परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




