Thursday, May 14, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मूल आणि पोंभुर्णा येथे आयोजित केलेल्या जनता दरबारांमध्ये नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यावर त्वरित कार्यवाहीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या दरबारांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मूल येथे झालेल्या जनता दरबारात काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, माजी आमदार देवराव भांडेकर, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार मृदुला मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांवर पक्षपातीपणाचे आरोप केले. नागरिकांनी रस्ते, पाणी, वीज आणि शासकीय योजनांमध्ये येणाऱ्या अडचणी स्पष्टपणे मांडल्या.

खासदार धानोरकर यांनी सर्व तक्रारींवर गांभीर्याने लक्ष देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. वर्षानुवर्षे प्रलंबित समस्यांवरही तत्काळ निर्णय घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. अधिकाऱ्यांनी कोणत्याही नागरिकांशी पक्षपात न करता काम करावे, असे स्पष्ट आदेशही खासदार धानोरकर यांनी दिले.

पोंभुर्णा येथे झालेल्या दुसऱ्या जनता दरबारात वनविभागाशी संबंधित समस्या, जमिनीच्या नोंदी आणि सामाजिक सुरक्षा योजनांमधील अडचणी ग्रामस्थांनी मांडल्या. यावरही खासदार धानोरकर यांनी तातडीने संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील १५ गावांतील पाणीप्रश्नांवरही तात्काळ तोडगा काढण्यात आला.

जनता दरबारात संवाद साधताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “जनता दरबार हे नागरिकांच्या समस्या थेट माझ्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम आहे. मी नेहमीच मतदारसंघातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर आहे आणि राहीन.”

खासदार धानोरकर यांच्या तत्परतेबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले असून, अशा प्रकारचे उपक्रम नियमित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News