नागपूर – जगभरातील बौद्ध समाजासाठी पवित्र असलेल्या महाबोधी महाविहार मंदिराच्या संपूर्ण ताब्यासाठी मागील १३४ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाने आता निर्णायक वळण घेतले आहे. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, देशभरातील भिक्खू संघ, आकाश लामा, सैनिक दल, तसेच विविध बौद्ध संघटनांच्या नेतृत्वाखाली मागील १२ फेब्रुवारी २०२५ पासून अनिश्चितकालीन साखळी उपोषण सुरू आहे.
या आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी उद्या, २ एप्रिल २०२५ रोजी नागपूरमध्ये भव्य शांती मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३.०० वाजता दिक्षाभूमी येथून सुरू होणारा हा मार्च संविधान चौक येथे समाप्त होणार आहे. भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटना, संस्था, बुद्ध विहार, तसेच हजारो उपासक-उपासिका या शांती मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.
बौद्ध धर्मियांसाठी महाबोधी महाविहार केवळ एक मंदिर नसून, तथागत गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी संबोधी प्राप्त झाली ती जागा आहे. त्यामुळे या स्थळाचा संपूर्ण ताबा बौद्ध समाजाकडे असावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या ऐतिहासिक आंदोलनाला आता व्यापक पाठिंबा मिळत असून, बौद्ध समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या संघर्षाची दिशा लवकरच स्पष्ट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.




