वर्धा: वीज ग्राहकांना अखंडित आणि उत्कृष्ट सेवा देण्याच्या प्रयत्नांना यश मिळत असताना, महावितरणच्या नागपूर परिमंडल अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील हिंगणी 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्राला प्रतिष्ठित ISO 9001:2015 आणि ISO 45001:2018 हे मानांकन मिळाले आहे.
हिंगणी उपकेंद्राने उच्च दर्जाची सेवा आणि सुरक्षिततेचे निकष पाळून हे मानांकन प्राप्त केले असून, यापूर्वी आर्वी आणि पिंपळगाव या उपकेंद्रांनीही हे प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यामुळे हिंगणी हे ISO मानांकन मिळवणारे वर्धा जिल्ह्यातील तिसरे महावितरण उपकेंद्र ठरले आहे.
ग्राहक सेवेत सातत्यपूर्ण सुधारणा
हिंगणी उपकेंद्रामार्फत सर्व वीज ग्राहकांना 24×7 वीज वितरण, उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची देखभाल, तसेच वितरण रोहित्रांचे उत्कृष्ट संचालन केले जाते. यासाठी ISO 9001:2015 हे गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी आणि ISO 45001:2018 हे व्यावसायिक आरोग्य व सुरक्षा व्यवस्थापनासाठी देण्यात आलेले प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार आहे.
ISO मानांकनामुळे वीज सेवा अधिक विश्वसनीय, सुरक्षित आणि सक्षम होईल, तसेच ग्राहक संतोषामध्ये वाढ होण्यास मदत होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.




