चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ७४६ कोटींचा अर्थसंकल्प आज सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. स्थायी समिती सभापती सौ. मनस्वी गिऱ्हे यांनी हा अर्थसंकल्प महापौरांकडे सादर केला. विशेष म्हणजे, २८.७६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मांडण्यात आला असून नागरिकांवर कोणतीही करवाढ लादलेली नाही.
या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या तरतुदी:
अमृत 2.0 योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले असून आरोग्य सेवांच्या आधुनिकीकरणासाठी २२.४९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी ३ कोटी आणि नाली बांधकामासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
समावेशक विकासावर भर:
महिला व बालकल्याणासाठी २.२८ कोटी, दिव्यांग कल्याणासाठी १.४२ कोटी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सौंदर्यीकरण व पर्यावरण:
शहरातील चौकांच्या सौंदर्यीकरणासाठी १ कोटी आणि एकूण शहर सौंदर्यीकरणासाठी ५० लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच ई-बस सेवा आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानालाही प्राधान्य देण्यात आले आहे.
इतर महत्त्वाचे निर्णय:
रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी १४.८७ कोटी रुपये ठेवण्यात आले असून नगरसेवक स्वेच्छा निधी ५ लाखांवरून १५ लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच अंत्यविधी अनुदान २,००० रुपयांवरून ३,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे.
उत्पन्नाचे स्रोत:
महानगरपालिकेला मालमत्ता कर, विविध शुल्क, जीएसटी अनुदान, १५वा वित्त आयोग तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून एकूण ४०३.४९ कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे.
हा अर्थसंकल्प विकासाभिमुख, समावेशक आणि नागरिक-केंद्रित असल्याचे सांगण्यात आले असून, चंद्रपूर शहराला आधुनिक आणि सक्षम शहराच्या दिशेने नेण्यासाठी तो महत्त्वाचा ठरणार आहे.




