गडचिरोली, महाराष्ट्र — गडचिरोली जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण व अचूक तपास करून मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या मालिका प्रकरणाचा छडा लावत एकूण 08 विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेले वाहन आणि रोख रक्कमेसह तब्बल 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेने अहेरी, ताडगाव, उपपोस्टे पेरमिली, राजाराम (खां), पोमकें-येमली-बुर्गी तसेच पोस्टे गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) येथे दाखल असलेले एकूण 09 गुन्हे उघड केले आहेत. जिल्ह्यातील विविध भागांत मोबाईल टॉवर बॅटरींच्या सातत्याने होत असलेल्या चोरीच्या प्रकरणांमुळे मोबाईल नेटवर्कवर परिणाम होत होता. याची दखल घेत पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केले होते.
तपासादरम्यान मिळालेल्या सुगावा, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपांनी गुन्ह्यांची कबुली दिली, त्यानंतर चोरीचा मुद्देमाल—चारचाकी वाहन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
गडचिरोली पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील मोबाईल टॉवर सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असल्याचे पाहिले जात आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.




