उमरी पोतदार (जि. चंद्रपूर) – पोलिसांनी अवैधरित्या जनावर (गौवंश) वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध कारवाई करून एक मोठी कामगिरी बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी तेलंगाना राज्यात कत्तलीसाठी जनावरे नेत होते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकूण 25 जनावरांची सुटका केली असून, दोन पिकअप वाहनांसह एकूण 18 लाख 95 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
उमरी पोतदार पोलिस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. जनावरांची वाहतूक करताना कोणतेही परवाने वा प्रमाणपत्रे नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध जनावर वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.




