नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांनी भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “सी.पी. राधाकृष्णन यांचे जीवन हे सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताच्या निष्ठेचे प्रतीक आहे. शिक्षण, सामाजिक उत्थान आणि सुशासनातील त्यांचे योगदान प्रेरणादायी असून त्यांच्या अनुभव आणि दूरदृष्टीमुळे भारत नव्या उंची गाठेल. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांचे मार्गदर्शन अमूल्य ठरले.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा देताना म्हटले, “राज्यपाल म्हणून अल्पावधीतच राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचा सन्मान वाढवला. त्यांचे समर्पण आणि विनम्र नेतृत्व प्रेरणादायी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या नेतृत्वाने सुयोग्य उमेदवार देशासमोर ठेवत एक आदर्श निर्माण केला आहे.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन संदेशात नमूद केले की, “राधाकृष्णन यांच्या अनुभवाचा लाभ देशाच्या लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या सक्षमीकरणासाठी होईल. हा विजय एनडीएच्या एकजुटीचा व केंद्र सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा पुरावा आहे. महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण असून संसदीय परंपरा आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांना बळकटी देण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल.”
सी.पी. राधाकृष्णन यांच्या विजयाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण असून त्यांचे नेतृत्व देशासाठी नवे शिखर गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





