चंद्रपूर : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान व गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारच्या प्रकरणांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात आयोजित बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. नयना उत्तरवार तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, अवैध गर्भलिंग निदान केंद्रांविषयी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. अशा प्रकरणात खातरजमा होऊन खटला दाखल झाल्यास माहिती देणाऱ्यास शासनाकडून 1 लाख रुपये व महानगरपालिकेकडून 25 हजार रुपये मिळून एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच स्टींग ऑपरेशनसाठी सहभागी झालेल्या गर्भवती महिलेलाही न्यायालयीन खटला दाखल झाल्यानंतर समान बक्षीस देण्यात येईल.
सर्व अल्ट्रासाऊंड केंद्रे, रुग्णालये व दवाखान्यांची काटेकोर तपासणी करावी, बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, दर तीन महिन्यांनी सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करावी, तसेच 12 आठवड्यांपेक्षा अधिक गर्भपात करणाऱ्या केंद्रांना आवर्जून भेट द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व कागदपत्रे व नोंदींची काटेकोर तपासणी करावी आणि आवश्यकतेनुसार पोलिस विभागासह इतर शासकीय यंत्रणांचे सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गर्भलिंग निदानाची माहिती देण्यासाठी शासनाने खालील टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत :
18002334475 (शासन हेल्पलाईन), 104 (आरोग्य हेल्पलाईन), 18002574010 (मनपा हेल्पलाईन),
WhatsApp : 8530006063
संकेतस्थळ : www.amchimulgimaha.in
तक्रार निवारण ॲप : grievance.cmcchandrapur.com
गर्भलिंग निवडीच्या प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी जनजागृतीबरोबरच कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक असून “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” या अभियानाला समाजातील प्रत्येक घटकाने हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.





