नांदेड : बिहारमधील बौद्धांचे पवित्र तीर्थक्षेत्र महाबोधी महाविहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी आज नांदेडमध्ये भिख्खू संघाच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. नवा मोंढा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यासह विविध आंबेडकरी संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला. जिल्हाभरातील भिख्खू, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
मोर्चाच्या निमित्ताने आंदोलकांनी महाबोधी महाविहार मुक्त करण्याची जोरदार मागणी केली. त्यांनी प्रशासनाकडे बौद्ध स्थळांचे स्वायत्त नियंत्रण बौद्ध संघटनेकडे द्यावे आणि बौद्ध समाजाच्या हक्कांचे रक्षण करावे, अशी मागणी केली.
या आंदोलनामुळे नांदेड शहरात काही काळ तणावपूर्ण शांतता होती, मात्र मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पडला. आंदोलकांनी विविध घोषणा देत आपली भूमिका स्पष्ट केली आणि प्रशासनाला महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा ठराव सादर केला.
आंबेडकरी संघटनांचा एल्गार
या मोर्चामुळे बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी लढण्याच्या निर्धाराला बळ मिळाले आहे. आंदोलकांनी सांगितले की, महाबोधी महाविहारावर बौद्धांचे हक्क प्रस्थापित होईपर्यंत संघर्ष सुरू राहील.




