चंद्रपूर | भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागांतर्गत सुरू असलेल्या “आपला पैसा – आपला अधिकार” या विशेष मोहिमेचा शुभारंभ आज चंद्रपूर जिल्ह्यात प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात पार पडला.

या मोहिमेचा उद्देश आर्थिक क्षेत्रातील दावा न केलेल्या ठेवी व मालमत्तेचे कार्यक्षम व जलद वितरण सुनिश्चित करणे हा असून, ही मोहिम 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येणार आहे.
या प्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक व्यवस्थापक महेश थुल, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आशिष पोरकुटे, बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक गौरव विश्वकर्मा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक शेखर बारापात्रे, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत सांगवी, तसेच जिल्ह्यातील विविध बँका, वित्तीय संस्थांचे अधिकारी व दावेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी सांगितले की, “ही मोहिम केंद्र सरकारची लोकहिताची संकल्पना असून, नागरिकांचे कोट्यवधी रुपये निष्क्रीय खात्यांत अडकून आहेत. सर्व नागरिकांनी, संस्थांनी आणि वारसांनी आपल्या बँकांशी संपर्क साधून दावा न केलेली रक्कम परत मिळवावी.”
ते पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून व्यवहार नसलेली बँक खाती निष्क्रीय होतात आणि अशा खात्यांतील रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार गोठविली जाते. “आपला पैसा – आपला अधिकार” मोहिमेमुळे नागरिकांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी सर्व बँकांना ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याचे निर्देश दिले तसेच ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत ठेवावेत, जेणेकरून निष्क्रीय खात्यांची संख्या कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आशिष पोरकुटे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, “ग्राहकाने दोन वर्षांपर्यंत व्यवहार न केल्यास खाते निष्क्रीय होते, आणि दहा वर्षांपर्यंत व्यवहार न झाल्यास ते ‘दावा न केलेले’ म्हणून गणले जाते. त्यामुळे प्रत्येक खातेदाराने आपले खाते सक्रिय ठेवणे आवश्यक आहे.”
चंद्रपूर जिल्ह्यातील आकडेवारीनुसार, 3 लाख 76 हजार 242 निष्क्रीय खात्यांमध्ये सुमारे 88 कोटी रुपयांची रक्कम दावा न केलेल्या स्वरूपात पडून आहे. यात वैयक्तिक, संस्थात्मक आणि शासकीय संस्थांची खाती समाविष्ट आहेत.
मोहिमेअंतर्गत प्रत्येक बँक शाखेत विशेष बूथ स्थापन करण्यात आले असून, संबंधित दावेदारांनी किंवा त्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह बँकेत संपर्क साधून आपली रक्कम परत मिळवावी, असे आवाहन सर्व बँक व्यवस्थापकांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या हस्ते काही पात्र दावेदारांना दावा मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रतीक गोंडणे यांनी केले तर आभार प्रदर्शन गौरव विश्वकर्मा यांनी मानले.




