छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गड-किल्ले आता केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे अभिमानस्थान ठरले आहेत. युनेस्कोने ११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील ११ दुर्ग आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला. या ऐतिहासिक निर्णयामुळे शिवरायांचे स्वराज्य जागतिक नकाशावर अधोरेखित झाले आहे.
या मान्यतेमागे केंद्र आणि राज्य सरकारच्या दूरदृष्टीबरोबरच अनेक अधिकारी, अभ्यासक आणि पुरातत्त्व विभागाचा अथक प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे सहकार्य, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे युनेस्कोतील सादरीकरण, तसेच अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा व हेमंत दळवी यांचा मोलाचा सहभाग यामुळे हा ऐतिहासिक क्षण घडला.
या १२ दुर्गांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. प्रत्येक किल्ला हा इतिहासाचा सजीव साक्षीदार असून स्वराज्याच्या संघर्ष, शौर्य आणि संस्कारांचा वारसा जपत उभा आहे. रायगड हा महाराजांचा राज्याभिषेकस्थळ व राजधानी किल्ला, प्रतापगड म्हणजे अफजलखानवधाचा साक्षीदार, पन्हाळा पावनखिंडीच्या बलिदानाने अमर, तर शिवनेरी शिवरायांचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो. सागरी किल्ल्यांमध्ये सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी यांनी महाराजांच्या नौदल सामर्थ्याला आकार दिला. साल्हेर मोगलांविरुद्धच्या विजयानं इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरलं. जिंजी किल्ला हा दक्षिणेकडील मराठा सामर्थ्याचा आधार होता.
युनेस्कोच्या या मान्यतेमुळे किल्ल्यांचे संवर्धन, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार असून स्वराज्याचा वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचेल. महाराष्ट्राचे दुर्गवैभव आता जागतिक ठेवा म्हणून गौरवले गेले आहे, ही प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाची बाब आहे.
शिवकाल फक्त आठवणीत नव्हे तर अनुभवात यावा, यासाठी आता जगभरातील पर्यटक महाराष्ट्रात येतील!





