चंद्रपूर – श्री गणेशोत्सव विसर्जन सोहळा यंदा प्रशासन, गणेश मंडळे व नागरिकांच्या सहकार्याने उत्साहात व शांततेत पार पडला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांनी उत्कृष्ट कामगिरी करत सोहळा यशस्वी केला.
नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेतर्फे 25 कृत्रिम कुंड व 3 फिरते विसर्जन कुंड उभारण्यात आले होते. यामध्ये एकूण फिरत्या विसर्जन कुंडात 180 मूर्ती विसर्जित झाल्या, त्यात 3 पीओपी मूर्तींचा समावेश होता. इरई नदी परिसरातील मोठ्या कुंडात 136 मूर्ती तर नदीपात्रात 2 मोठ्या मूर्तींचे विसर्जन सकाळी 10 वाजता करण्यात आले.
विसर्जन स्थळी काही नागरिकांना अस्वस्थ वाटल्याने व किरकोळ दुखापती झाल्याने तात्काळ प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली. गांधी चौक, जटपूरा गेट व दाताळा रोड या मुख्य विसर्जन स्थळी अँब्युलन्स सज्ज ठेवण्यात आल्या. तसेच पोलिसांनी सोहळा शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली.
शहर व विसर्जन स्थळांवर स्वच्छता व सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला. अग्निशमन व स्वच्छता कर्मचारी 3 शिफ्टमध्ये कार्यरत होते. विसर्जन होताच शहराची तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 72 विसर्जन मार्गांवर व 16 विसर्जन स्थळी असे एकूण 88 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून लक्ष ठेवले गेले. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही.
यावर्षी विसर्जन स्थळ परिसरात सिमेंटचे रॅम्प तयार केल्यामुळे चिखल टळला व प्रवेश सुलभ झाला. प्रत्येक मंडळाची स्वतंत्र नोंद घेऊन प्रवेश दिल्याने गर्दी नियंत्रण साधण्यात आले. धार्मिक विधी पार पाडण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला तसेच मोठ्या मूर्तींसाठी क्रेन्सची व्यवस्था करण्यात आली.
या संपूर्ण व्यवस्थेसाठी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, संदीप चिद्रवार, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, अनिलकुमार घुले, डॉ. अमोल शेळके, रवींद्र कळंबे, राहुल पंचबुद्धे आदी अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून देखरेख करत होते.
यामुळे यंदाचा श्री गणेश विसर्जन सोहळा यशस्वी, शांततापूर्ण व सुरळीतरीत्या संपन्न झाला.





