चंद्रपूर : “विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरतेच मर्यादित न राहता, आरोग्याची देखील तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, मैदानी खेळ आणि मोबाईलपासून दूर राहणे हेच निरोगी जीवनाचे मूलमंत्र आहेत,” असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोगतज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. अनुप पालीवाल यांनी केले.
छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित स्व. स्वप्नील महावादीवार स्मृतीप्रित्यर्थ “विकसित विद्यार्थी – सक्षम राष्ट्र” या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. छोटूभाई पटेल यांच्या तैलचित्राला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. पालीवाल म्हणाले की, “सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांमध्ये फास्ट फूड आणि मोबाईलचा अतिरेक हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे प्रथिनयुक्त आहार, पुरेशी झोप आणि खेळ हे दिनचर्येचा भाग असायला हवा.”
डॉ. पराग जवळे यांचा संदेश :
गोंडपिपरी येथील तालुका आरोग्य अधिकारी आणि छोटूभाई पटेल हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. पराग जवळे यांनी देखील विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक महत्त्वाचे मार्गदर्शन केले. “उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा” या उक्तीचा उल्लेख करत त्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर दिला.
“सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, स्वच्छता पाळणे, शिळे अन्न व उघड्यावरचे पदार्थ टाळणे, हिरव्या भाज्या व कॅल्शियमयुक्त आहार घेणे हे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. तसेच पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून बचावाचे उपायही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
“शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. मानसिकदृष्ट्या सशक्त विद्यार्थीच राष्ट्रनिर्मितीत मोठे योगदान देऊ शकतात,” असेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती :
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांत (वैद्य), उपमुख्याध्यापक मानकर, निंबाळकर, कुंमरे, माजी विद्यार्थी डॉ. पराग जवळे, तसेच संघाचे सदस्य जितेंद्र मशारकर, धीरज साळुंके, सागर कुंदोजवार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बम सर यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.





