चंद्रपूर – शहरातील मॉल्स, हॉटेल्स, रुग्णालये, दवाखाने आणि मोठ्या इमारतींनी अग्निशमन विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक असून, अनेक आस्थापना या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून विशेष मोहीम राबवून अशा नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे.
कायद्याचा अवलंब आणि जबाबदाऱ्या
महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंधक कायदा 2006 व सुधारित 2009 अनुसार, 15 मीटरपेक्षा उंच इमारती किंवा 150 चौ. मी. पेक्षा मोठ्या व्यावसायिक इमारतींना अग्निशमन प्रमाणपत्र अनिवार्य आहे. मालकाने दर 6 महिन्यांनी ‘फायर ऑडिट’ करून उपाययोजना करणं आवश्यक आहे. यामध्ये तारांकित हॉटेल्स, लॉजिंग, सिनेमा हॉल्स, मंगल कार्यालये, नाट्यगृहे, एलपीजी गोडावून, फटाका दुकाने, बहुमजली इमारती, रुग्णालये यांचा समावेश आहे.
25 घटनांमध्ये जीवितहानी टळली
एप्रिल 2024 ते जुलै 2025 या कालावधीत शहरात 25 आगीच्या घटना घडल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भविष्यात धोका टाळण्यासाठी अग्निशमन यंत्रणा अत्यावश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध
शहरातील व्यावसायिकांना rts.cmcchandrapur.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून ‘ना हरकत प्रमाणपत्र’साठी अर्ज करता येतो. मागील आर्थिक वर्षात 33 प्रमाणपत्रे देण्यात आली होती, त्यातील 26 ऑनलाईन पद्धतीने होती. चालू वर्षात 458 आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या असून, तपासणीत यंत्रणा नसल्यास कारवाई केली जाणार आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्ज ‘अ’ (बांधकाम परवानगी असलेल्या इमारतींसाठी) :
अर्ज, मालकी हक्क पुरावे, अधिकृत बांधकाम नकाशा, अग्नि सुरक्षा यंत्रणा तपशील, बांधकाम परवानगी, स्ट्रक्चर सेफ्टी प्रमाणपत्र, एजन्सी समती पत्र, चालू वर्षाचे घर व नळ टॅक्स पावती
अर्ज ‘ब’ (बांधकाम परवानगी नसलेल्या इमारतींसाठी) :
अर्ज, मालकी हक्क पुरावे, अग्नि सुरक्षा यंत्रणा तपशील, स्ट्रक्चर सेफ्टी प्रमाणपत्र, एजन्सी समती पत्र, चालू वर्षाचे घर व नळ टॅक्स पावती.
सुरक्षिततेसाठी आवश्यक पाऊले
अग्निशमन प्रमुख राहुल पंचबुद्धे यांनी सांगितले की, “रुग्णालये, मॉल्स, चित्रपटगृहे आणि बहुमजली इमारतींसारख्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा अनिवार्य आहे. लहान दुकाने, कार्यालयांनी सुद्धा फायर सिलिंडर ठेवणे गरजेचे आहे. वेळेवर नियंत्रणासाठी प्राथमिक सुरक्षा व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे.”
महानगरपालिकेने नागरिक व व्यावसायिकांना आगहात करत त्वरित अग्निशमन प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन केले आहे.





