यवतमाळ – उमरखेड नगर परिषदेकडून दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा पाच टक्के निधी अद्याप वितरित न झाल्यामुळे, आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात दिव्यांगांनी जोरदार आंदोलन छेडले. भर पावसात दिव्यांग बांधवांनी रस्त्यावर लोटांगण घालून नगर परिषदेच्या निष्काळजीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
आंदोलनाच्या वेळी काही आंदोलकांनी थेट पालिका कार्यालयावर चढून जोरदार घोषणाबाजी केली. “आमचा हक्क आम्हाला द्या”, “दिव्यांगांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही”, अशा घोषणा देत त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.




