चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व 38 दरवाजे 1 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता उघडण्यात येणार आहेत. गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रा. ल. मोरघडे यांनी ही माहिती दिली.
चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झाले असून यामध्ये 691 मीटर लांबीच्या रचनेवर 15 मीटर लांब व 9 मीटर उंचीचे लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आले आहेत. 15 ऑक्टोबर 2024 पासून हे दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर नियंत्रणाच्या दृष्टीने बॅरेजमध्ये साठवलेला पाणीसाठा कमी करण्यासाठी हे दरवाजे उघडण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीत बॅरेजमधील पाण्याची पातळी 183 मीटर असून जिवंत साठा 53.52 दलघमी इतका आहे. नियोजित विसर्गानुसार, 1 जून रोजी सकाळी 8 वाजता उभ्या दरवाजांमधून व रिव्हर स्लुइसद्वारे तब्बल 472.84 क्यूमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असून हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यात्रेकरू, आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, रेती उत्खनन करणारे, पशुपालक व इतर नागरिकांनी नदीकाठावर जाणे टाळावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुडीत क्षेत्रातील व संभाव्य बाधित गावांची यादी पुढीलप्रमाणे :
हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली, गाडंली, वढोली चक, पेडगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेगांव, कापसी, उपरी (सावली तालुका).
प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.




