चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि सेवा भावनेने कार्य केले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले. त्या गोंडपिपरी व बल्लारपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना संबोधित करत होत्या.
“प्रशासन हे जनतेसाठी सरकारचे दुवा आहे. कार्यालयात आलेला प्रत्येक लाभार्थी समाधानी परत जावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे,” असे आवाहन करत खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचे निर्देश दिले.
गोंडपिपरी येथील बैठकीस उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार बाहेकर, पोलीस निरीक्षक हत्ती गोटे, गटविकास अधिकारी चनफने, नगराध्यक्ष कुळमेथे, तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते व पदाधिकारी आणि विविध गावांतील सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बल्लारपूर येथील बैठकीत उपविभागीय अधिकारी अजय चरडे, नगर परिषद मुख्याधिकारी वाघ, गटविकास अधिकारी साळवे, पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे, अप्पर तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या दोन्ही बैठकीत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या गेल्या आणि अनेक तक्रारींचे त्वरित निराकरणही करण्यात आले. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी प्रशासन सजग राहील, असे आश्वासन बैठकीत देण्यात आले.
या बैठकीतून स्पष्ट झाले की शासनाच्या विविध योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अधिक गतीने करण्यात येणार आहे.




