अहिल्यानगर : शहरातील प्रमुख व्यापारी व सराफ बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंज बाजार परिसरात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. भाजी मंडई व परिसरातील काही व्यावसायिकांनी रस्त्यावर स्टॉल, साहित्य तसेच अन्य वस्तू ठेवून अतिक्रमण केल्याने नागरिकांच्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
गंज बाजार परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे रस्ते मोकळे व सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याने महानगरपालिकेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. यापूर्वीही संबंधित ठिकाणी अनेक वेळा अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. तसेच महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः परिसराची पाहणी करून रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली होती. मात्र वारंवार सूचना, समुपदेशन आणि कारवाई करूनही काही व्यावसायिकांकडून पुन्हा अतिक्रमण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी महानगरपालिकेच्या पथकाने अतिक्रमण हटविण्याबरोबरच संबंधित व्यावसायिकांचे समुपदेशन करून सार्वजनिक रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्याबाबत सक्त सूचना दिल्या. भविष्यात पुन्हा अतिक्रमण आढळून आल्यास दंडात्मक कारवाई, माल जप्ती तसेच इतर कठोर प्रशासकीय उपाययोजना करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला.
नागरिकांच्या सुरक्षित, सुकर आणि सुरळीत वाहतुकीसाठी महानगरपालिका कटिबद्ध असून शहर अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




