चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या इशाऱ्यानुसार 28 व 29 जुलै 2026 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करताना सांगितले की, अतिमुसळधार पावसाच्या काळात शक्यतो घरातच सुरक्षित आश्रय घ्यावा. जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुरू असताना खिडक्या व दरवाज्यांपासून दूर राहावे. रोडवे अंडरपास, सखल भाग, नाले, ड्रेनेजचे खड्डे तसेच पाणी साचलेल्या ठिकाणांमधून जाणे टाळावे. खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पावसात वाहन चालविणे टाळावे तसेच वीजवाहिन्या व विद्युत तारा यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे.
मेघगर्जना आणि वीज चमकत असताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरू असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराच्या बाल्कनीत, छतावर किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे तातडीने बंद करावीत. लोखंडी कुंपण, विजेचे खांब, धातूच्या वस्तू आणि पाण्यापासून दूर राहावे. पाण्यात उभे असल्यास त्वरित बाहेर पडावे.
याशिवाय, विजा चमकत असताना लँडलाईन फोनचा वापर करू नये, शॉवरखाली अंघोळ करू नये तसेच पाण्याच्या नळांना किंवा पाइपलाइनला स्पर्श करणे टाळावे. कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नये. लोखंडी संरचनेच्या तंबू किंवा शेडमध्ये आश्रय घेऊ नये. उंच झाडाखाली किंवा धातूच्या उंच मनोऱ्याजवळ थांबणेही धोकादायक असल्याने ते टाळावे. घरात असतानाही उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देऊन कोणतीही अफवा न पसरवता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.




