मुंबई : राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांचे कामकाज अधिक गतिमान, सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने एअर इंडिया इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या नूतनीकरणामध्ये लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी एअर इंडिया इमारतीच्या नूतनीकरणासंदर्भातील सादरीकरणावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य सचिवांना संबंधित विभागांची बैठक घेऊन कोणते शासकीय विभाग नूतनीकरणानंतर एअर इंडिया इमारतीत स्थलांतरित करणे प्रशासकीयदृष्ट्या तसेच नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरेल, याचा सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश दिले. प्रशासकीय सेवा अधिक कार्यक्षम, सुलभ आणि लोकाभिमुख होण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, विकास चंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव (विशेष चौकशी अधिकारी) पंकज कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि वास्तुविशारद उपस्थित होते.
यावेळी संबंधित वास्तुविशारदांनी एअर इंडिया इमारतीच्या संभाव्य नूतनीकरण आराखड्यांचे सादरीकरण केले. नागरिकांना अधिक सुलभ, कार्यक्षम आणि आधुनिक शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाला महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.




