अहिल्यानगर : महानगरपालिका हद्दीतील अमरधाम हे केवळ सार्वजनिक ठिकाण नसून शहरातील नागरिकांच्या भावना, संस्कार आणि स्मृतींशी जोडलेले अत्यंत पवित्र स्थान आहे. येथे नागरिक आपल्या प्रियजनांच्या अंत्यविधीसाठी येतात आणि त्यांना अखेरचा निरोप देतात. त्यामुळे या परिसराचे पावित्र्य व गांभीर्य जपणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या तुलनेत अहिल्यानगरचे अमरधाम हे स्वच्छता, नैसर्गिक वातावरण आणि सुस्थित व्यवस्थापनासाठी विशेष ओळखले जाते. या ठिकाणाचा अधिक विकास आणि सुशोभीकरण करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून विकासकामांना सुरुवात झाली आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या पाहणीदरम्यान आयुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास अमरधाम परिसरातील काही ठिकाणी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच परिसराचा अयोग्य वापर होत असल्याचेही समोर आले. ज्या ठिकाणी अंत्यविधी पार पडतात आणि जिथे नागरिक आपल्या आप्तस्वकीयांना अखेरचा निरोप देतात, त्या ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. अमरधाम हे मनोरंजन किंवा गैरप्रकारांसाठी नसून श्रद्धा, संवेदना आणि स्मरण यांचे स्थान असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनीही या परिसराचा सन्मान राखावा आणि त्याचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




