Friday, June 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

नागपूरमध्ये १० हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्स्ट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन

नागपूर : यंत्र इंडिया लिमिटेडच्या अंबाझरी आयुध निर्माणी येथे उभारण्यात येणाऱ्या १० हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्स्ट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन संरक्षणमंत्री Rajnath Singh यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यात देशाला संरक्षणदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी अत्यावश्यक संरक्षण तंत्रज्ञान आणि उत्पादनांवर स्वतःचे नियंत्रण असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यंत्र इंडियाचा हा अत्याधुनिक प्रकल्प भारताचे आयात अवलंबित्व कमी करून देशाला आत्मनिर्भर बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पामुळे संरक्षण, एरोस्पेस, विमाननिर्मिती, क्षेपणास्त्र कार्यक्रम, रेल्वे आणि इतर धोरणात्मक क्षेत्रांसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या अॅल्युमिनियम मिश्रधातूंच्या निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत लक्षणीय वाढ होईल, असेही ते म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामध्ये देशात विकसित झालेल्या संरक्षण उपकरणांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे नमूद केले. मोठ्या संरक्षण यंत्रणांची खरी ताकद हजारो लहान-मोठ्या घटकांमध्ये दडलेली असते आणि अॅल्युमिनियम एक्स्ट्रूजन प्रेसमुळे या क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा वेग आणखी वाढेल, असे त्यांनी सांगितले.

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये देशांतर्गत संरक्षण उत्पादन सुमारे ४६ हजार कोटी रुपये होते, ते २०२५-२६ मध्ये विक्रमी १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच संरक्षण निर्यात १ हजार कोटी रुपयांवरून वाढून ३८ हजार ४२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आगामी दोन ते तीन वर्षांत तीन लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन आणि ५० हजार कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट वेळेपूर्वीच साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भारत जागतिक संरक्षण उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात वेगाने पुढे जात असून, या प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होतील, असे ते म्हणाले.

पंतप्रधान Narendra Modi यांनी दिलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आत्मनिर्भर भारताची उभारणी आवश्यक आहे. देशाने या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली असून हा प्रकल्प त्याचे उत्तम उदाहरण आहे.

कार्यक्रमास संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार, संयुक्त सचिव गरिमा भगत, यंत्र इंडिया लिमिटेडचे सीएमडी विजय कुमार अय्यर तसेच संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News