चंद्रपूर – रयतवारी कॉलरी येथील गुप्ता यांच्या मालकीच्या दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून तब्बल 280 किलो प्लास्टिक जप्त केले. यासोबतच प्लास्टिकचा साठा केल्याबद्दल दुकानदाराकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित दुकानदारास कठोर ताकीद देत पुन्हा असे कृत्य आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मनपा हद्दीत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असून, साठा किंवा वापराबाबत माहिती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षीस देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून मनपाकडे सतत माहिती पोहोचत आहे.
महाराष्ट्रात 1 जुलै 2022 पासून एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर संपूर्ण बंदी लागू आहे. महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार उल्लंघन करणाऱ्यास दंडासोबतच 3 महिन्यांचा कारावास होऊ शकतो.
ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त अनिलकुमार घुले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात करण्यात आली. या कारवाईत डॉ. अमोल शेळके, भुपेश गोठे, मनीष शुक्ला, राज हजारे, शुभम खोटे, शुभम चिंचेकर, राहुल गगपल्लिवर आणि पूनम समुद्रे यांनी सहभाग घेतला.





