चंद्रपूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत राज्यस्तरीय निर्देशानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध झोन कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्षमता वृद्धी (कॅपॅसिटी बिल्डिंग) कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देणे हा होता. कार्यशाळेदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांच्या हक्क, सुविधा आणि शासकीय योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यशाळेत सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत झाली असून त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे.
महानगरपालिका प्रशासनाच्या मते, अशा प्रकारच्या क्षमता वृद्धी कार्यशाळांमुळे कर्मचारी अधिक सक्षम होऊन नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यास मदत होते. यामुळे स्वच्छ, सुंदर आणि सक्षम चंद्रपूर घडविण्याच्या संकल्पनेलाही बळकटी मिळत आहे.
“सक्षम कर्मचारी – सक्षम महानगरपालिका – स्वच्छ व प्रगत चंद्रपूर” हा संदेश या कार्यशाळेतून प्रभावीपणे देण्यात आला.




