Thursday, June 18, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

शासनाची बंदी झुगारून खडकी येथे HTBT कपाशीची प्रतीकात्मक लागवड; तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळावा संपन्न

राळेगाव, यवतमाळ : केंद्र शासनाने यंदाही HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कपाशी बियाण्यांच्या लागवडीस मान्यता न दिल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या वतीने राळेगाव तालुक्यातील खडकी येथे मंगळवारी (१७ जून) तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिबंधित HTBT कपाशी बियाण्याची प्रतीकात्मक लागवड करून शासनाच्या धोरणांविरोधात निषेध नोंदविला.

शेतकरी संघटनेच्या मते, २००८ पासून तणनाशक-प्रतिरोधक तंत्रज्ञान असलेले HTBT कपाशी बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. मात्र आजपर्यंत या तंत्रज्ञानाला अधिकृत मान्यता मिळालेली नसल्याने शेतकरी आधुनिक कृषी तंत्रज्ञानापासून वंचित राहत असल्याचा दावा मेळाव्यात करण्यात आला.

संघटनेने यापूर्वी १० जून रोजी गुजरात सीमेजवळील नंदुरबार येथे सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात १७ जून रोजी दुपारी १२ वाजता खडकी (ता. राळेगाव) येथील शेतकरी राजेंद्र झोटींग यांच्या शेतात प्रतीकात्मकरीत्या HTBT बियाण्याची लागवड करण्यात आली.

मेळाव्यात वक्त्यांनी शेतकऱ्यांना कोणते बियाणे वापरायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणी केली. नवीन कृषी तंत्रज्ञानावर निर्बंध घालण्याऐवजी शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून देशाची कृषी उत्पादनक्षमता वाढून आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप होते. यावेळी ललित बहाळे, अनिल घनवट, प्रज्ञाताई बापट, सीमाताई नरोडे, विजय निवल, मिलिंद दामले आणि दीपक आनंदवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात स्व. शरद जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

वक्त्यांनी शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे मतही यावेळी मांडण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेत नव्याने प्रवेश केलेल्या युवा शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गजानन पारखी, सतीश देशमुख, चंद्रशेखर देशमुख, दशरथ पाटील, आशिष मुसळे, हिम्मतराव देशमुख, बबनराव चौधरी, अक्षय महाजन, गिरीष तुरके, मोहनराव चौधरी, गोपाल भोयर, किशोर झोटींग, निलेश डवरे, दशरथ काळे, भास्कर पाटील, गजानन कोल्हे, विठ्ठल खोंडे यांच्यासह अकोला, बुलढाणा, नांदेड, वाशीम, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतील पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कृषी विभागाचे अधिकारी तसेच पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. राजेंद्र झोटींग यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सांगता शेतकरी एकतेची शपथ, वज्रमूठ बांधून घोषणाबाजी आणि स्नेहभोजनाने करण्यात आली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News