Thursday, April 23, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्याचा संकल्प – पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचा शिक्षण विभागाला निर्धार

चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी ठोस पावले उचलावीत, असा सल्ला राज्याचे आदिवासी विकास मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिला. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याची क्षमता जिल्हा परिषद शाळांमध्ये असूनही इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे पालकांचे लक्ष वळत आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर देत पालकांचा विश्वास संपादन करावा, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. उईके बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा निर्धार

डॉ. उईके यांनी शिक्षण क्षेत्रातील ‘असर’ आणि ‘नॅस’ उपक्रमांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. शाळांमध्ये शिक्षक समिती तयार करून अध्यापन प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करावे. तसेच शिक्षकांनी एकमेकांचे मूल्यांकन करून अध्यापनाच्या दर्जात सुधारणा करावी. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यासाठी आत्तापासून नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दर 15 दिवसांनी चावडी वाचन उपक्रम

शिक्षण उपक्रमांतर्गत दर 15 दिवसांनी पालकांच्या उपस्थितीत दर्जेदार चावडी वाचन उपक्रम राबवण्याची सूचना त्यांनी दिली. तसेच, इंटरनेट व विद्युत खंडित होणाऱ्या शाळांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गाव पातळीवर नियमित शाळा भेटीचे आदेश

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाव पातळीवरील शाळांना नियमित भेट देऊन शाळेतील सीसीटीव्ही कार्यरत आहेत का, तक्रार पेटींचा उपयोग होतो का, याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले. तसेच सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

सायकल वाटप आणि सीसीटीव्हीचा आढावा

जिल्ह्यातील 7445 ग्रामीण भागातील मुलींना मानव विकास अंतर्गत सायकलचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 1549 जिल्हा परिषद शाळांपैकी 475 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, उर्वरित 549 शाळांसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 61 हजार 687 आहे.

शिक्षण विभागाने घेतलेले पाऊल

विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, मूलभूत सुविधा आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण तयार करून जिल्हा परिषद शाळांना पालकांचा विश्वास मिळवून द्यावा, असा स्पष्ट संदेश पालकमंत्र्यांनी दिला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News