गडचिरोली : जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) गडचिरोली आणि उपपोलीस ठाणे रेपनपल्ली यांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा रेपनपल्ली परिसरात सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून विविध प्रकारचा अवैध दारू साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
या कारवाईत एकूण ₹५,९८,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
गडचिरोली पोलिसांनी जिल्ह्यात अवैध दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधातील कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




