प्रणयकुमार बंडी
चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील बेलसणी येथे कार्यरत असलेली ‘महामाया इस्पात प्रा. लि.’ ही कंपनी अचानक बंद करण्यात आल्याने सुमारे ७०० कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनी बंद झाल्यामुळे शेकडो कामगारांचा रोजगार हिरावला गेला असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर कामगारांच्या हितासाठी आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. अशोक उईके यांना पत्राद्वारे तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली आहे. कंपनी त्वरित सुरू करून सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, अशी प्रमुख मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कंपनी अचानक बंद झाल्यामुळे कामगारांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून अनेक कुटुंबांचे उत्पन्नाचे एकमेव साधन बंद झाले आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च, आरोग्य सेवा तसेच दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कामगारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरक्षित राहावा आणि त्यांना रोजगाराची हमी मिळावी, यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या रोजगाराच्या संरक्षणासाठी हा प्रश्न शासन स्तरावर सातत्याने मांडला जाईल, तसेच कामगारांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्यात येईल, असा निर्धारही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून होत आहे. कंपनी पुन्हा सुरू झाल्यास शेकडो कुटुंबांच्या रोजगाराचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




