अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ देणार नाही – डॉ. हुलगेश चलवादी
पुणे : महाराष्ट्रातील नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयका’विरोधात बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव व पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी हे विधेयक तातडीने मागे घेण्याची आग्रही मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
डॉ. चलवादी म्हणाले की, “सरकारने मांडलेले हे विधेयक पुरोगामी महाराष्ट्राच्या मूल्यांविरोधात असून, नागरिकांच्या अभिव्यक्ती, भाषण, गोपनीयता व सभा स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालणारे आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीने नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली होऊ देणार नाही.”
या विधेयकाद्वारे सरकारला ‘बेकायदेशीर’ संघटनांवर बंदी घालण्याचे व संशयितांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार मिळणार आहेत. याचा गैरवापर होण्याची शक्यता असून, सरकार विरोधातील विचारधारेच्या संघटनांवर अमर्यादित शक्ती वापरण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
डॉ. चलवादी यांनी सरकारवर प्रश्नांचा भडिमार करत विचारले की, “जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्तांना विशिष्ट क्षेत्र अथवा इमारतींवर कारवाई करण्याचा अधिकार देणे म्हणजे घटनाबाह्य ‘बुलडोजर’ राजवटीला कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रयत्न आहे का?”
तसेच, सरकारच्या माध्यम निरीक्षण केंद्र स्थापनेच्या योजनेवर टीका करताना त्यांनी विचारले, “या केंद्रांच्या माध्यमातून पत्रकारांवर पाळत ठेवून त्यांचा आवाज दाबण्याचा सरकारचा हेतू आहे का?” हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारे असून, सर्वसामान्य नागरिक सरकारला प्रश्न विचारू शकणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होईल, हे अत्यंत गंभीर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने नागरिकांच्या रोषाचा विचार करून हे विधेयक तातडीने मागे घ्यावे, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.




