मुंबई : मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव आणि राज्य शासनाच्या राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्राप्त स्वर्गीय सुधीर पुराणिक यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त, मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कक्षातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं.
या उपक्रमांतर्गत, मुंबईतील विविध पाच प्रमुख रेल्वे स्थानकांवर एकाच वेळी रक्तदान शिबिरं भरवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, घाटकोपर, बेलापूर, चर्चगेट आणि अंधेरी या स्थानकांवर पार पडलेल्या या शिबिरांमधून एकूण २९५ एकक रक्त संकलित करण्यात आलं.
रक्तदानाच्या या उपक्रमाला तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुधीर पुराणिक यांच्या समाजकार्याची आठवण जागवणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटल्याचं मत विविध मान्यवरांनी व्यक्त केलं.




