पुणे : महाबोधी महाबुद्धविहार मनुवादी ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून ते बौद्ध भिक्खू आणि अनुयायांच्या ताब्यात द्यावे, तसेच १९४९ चा बुद्धगया मंदिर कायदा तात्काळ रद्द करावा, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोनचे मुख्य प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय आयुक्तांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.
बौद्ध अनुयायांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा प्रश्न
बुद्धगया येथील महाबोधी महाबुद्धविहार गेल्या अनेक दशकांपासून मनुवादी ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. यामुळे बौद्ध अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून, विहारात वेळोवेळी हिंदू कर्मकांड तसेच बुद्ध मूर्तींच्या विटंबनेच्या घटना घडत आहेत. भारतातील इतर धार्मिक स्थळे संबंधित धर्माच्या अनुयायांच्या ताब्यात असताना, महाबोधी विहार हिंदू पुजार्यांच्या ताब्यात का? असा सवाल बौद्ध समाजातून उपस्थित केला जात आहे.
डॉ. हुलगेश चलवादी म्हणाले की, “चक्रवर्ती सम्राट अशोकाने उभारलेल्या या ऐतिहासिक स्थळाचे व्यवस्थापन बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात असायला हवे. जगभरातील बौद्ध अनुयायी येथे येतात, मात्र या ठिकाणी बौद्धांना त्यांच्या श्रद्धेनुसार पूजा करण्याचे स्वातंत्र्य नाही.”
सरकारवर बहुजन-विरोधी मानसिकतेचा आरोप
महाबोधी विहार मुक्ती आंदोलन गेल्या अनेक दशकांपासून सुरू असूनही सरकार आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. “भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असतानाही बौद्ध भिक्खू आणि अनुयायांना त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो. सरकारची भूमिका ही बहुजन-विरोधी मानसिकता दर्शवणारी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाबोधी विहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावा
बहुजन समाज पक्षाने आपल्या निवेदनात मागणी केली आहे की, बुद्धगया मंदिर कायदा रद्द करून महाबोधी महाबुद्धविहार बौद्ध भिक्खू आणि अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावा. तसेच, भारतीय घटनेनुसार बौद्ध धर्मीयांना त्यांच्या श्रद्धेनुसार पूजा आणि व्यवस्थापन करण्याचा संपूर्ण अधिकार मिळावा, अशी भूमिका या निवेदनात मांडण्यात आली आहे.




