चंद्रपूर : अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 अंतर्गत प्रभावी अंमलबजावणी, नियंत्रण व समस्या निवारणासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्याची तपासणी करण्यात आली.
या बैठकीत जिल्हाधिकारी गौडा यांनी स्पष्ट निर्देश दिले की, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध अन्नपदार्थांमध्ये भेसळ होणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी. अन्न व्यवसायिकांच्या आस्थापनांची नियमित तपासणी करून भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी.
प्रमुख सूचना :
अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. जनतेमध्ये अन्न सुरक्षेबाबत जनजागृती वाढवावी. सुगंधी गुटखा व इतर प्रतिबंधित वस्तूंच्या विक्रीस आळा घालावा. अन्न व औषध प्रशासन विभागाने नियमित तपासण्या वाढवाव्यात.
बैठकीस अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रवीण उमप, पोलिस उपअधीक्षक (गृह) योगेश्वर पारधी, उपसंचालक (कृषी) चंद्रकांत ठाकरे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी पी.के. खरमाटे, शिक्षण विभागाची अर्चना मासीरकर तसेच अन्न व्यवसायिक प्रतिनिधी प्रशांत चिटनुरवार उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त उमप यांनी या बैठकीत तपशीलवार सादरीकरण सुद्धा केले.
तक्रारीसाठी संपर्क :
‘वंदे मातरम चांदा’ टोल फ्री क्रमांक: 1800-233-8691 और अन्न व औषध प्रशासन टोल फ्री क्रमांक: 1800-222-365
ऑनलाईन तक्रार: foscos.gov.in या संकेतस्थळावर ‘Food Consumer Grievance’ विभागात नोंदवता येईल.
जिल्हाधिकारी गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा संबंधित उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी भेसळयुक्त अन्नपदार्थांबाबत जागरूक राहून तक्रार व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




