घुग्घुस (चंद्रपूर), 6 मे 2025 – राजीव रतन चौकातील अपूर्ण उड्डाणपुलाच्या कामामुळे घडलेल्या गंभीर घटनेमुळे घुग्घुसकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दिनांक 5 मे रोजी सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान, वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काँग्रेस पक्षाने कडक भूमिका घेत, उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष राजुरेड्डी व अॅड. निलेश हरणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन ते चार वर्षांपासून कासवगतीने सुरु असलेले उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असून त्यामुळे या भागातील नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. यापूर्वीही अनेक अपघात व मृत्यू घडले असून, त्याला कंपनीची बेजबाबदार व निष्क्रिय भूमिका कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, उड्डाणपुलाचे काम केवळ दिखावा ठरले असून, नियोजित वेळेत पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे वाहतुकीची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. रेल्वे गेट सतत बंद राहत असल्यामुळे अर्ध्या तासास एकदा वाहतूक अडते, आणि त्यातच एकेरी व खराब झालेल्या रस्त्यामुळे प्रचंड कोंडी निर्माण होते. यामुळे रुग्ण, विद्यार्थी, नोकरदार व ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तत्काळ उपायांची मागणी :
जडवाहतुकीसाठी रात्री ते पहाटेपर्यंतचा वेळ निश्चित करावा.
उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे.
रस्त्यावरचे खड्डे तत्काळ भरून काढावेत.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीचे नियोजन करावे.
काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत, तर कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या वेळी काँग्रेसचे नेते सैय्यद अन्वर, विशाल मादर, अलीम शेख, बालकिशन कुळसंगे, रोहित डाकूर, सुनील पाटील, शहंशाह शेख, अंकुश सपाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष आहे.