जळगाव : बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने यावल प्रादेशिक वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या वन्यप्राणी प्रगणना कार्यक्रमाला निसर्गप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या विशेष उपक्रमात ४९२ हून अधिक वन्यप्राणी व पक्ष्यांची नोंद करण्यात आली असून, एकूण २७ पेक्षा अधिक प्रजातींचे दर्शन झाले.
यावल वनविभागाने प्राणी प्रगणनेसाठी एकूण ३९ मचाणांचे नियोजन केले होते. या मचाणांवरून संपूर्ण रात्रभर निसर्गप्रेमी आणि अधिकाऱ्यांनी जंगलात थांबून वन्यजीवांचे निरीक्षण केले. बिबट्या, अस्वल, लांडगा, कोल्हा, निलगाय, काळवीट, चौशिंगा, चिंकारा, साळिंदर यांसारख्या प्राण्यांसह विविध दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन झाले. यामध्ये बिबट्याचे रावेर वनक्षेत्रात प्रत्यक्ष दर्शन, तर वैजापूर भागात त्याचे पायाचे ठसे आढळले.
या उपक्रमात १५० हून अधिक निसर्गप्रेमी, अभ्यासक, वन अधिकारी आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता. QR कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी पद्धतीचा वापर करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी जंगलातील शांततेत आणि पौर्णिमेच्या प्रकाशात प्राणी निरीक्षणाची थरारक अनुभूती निसर्गप्रेमींना मिळाली.
उपस्थित मान्यवरांमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी, तहसीलदार बंडू कापसे, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, मानद वन्यजीव रक्षक रविंद्र फालक आदींचा समावेश होता. वनसंरक्षक (प्रादेशिक) श्रीमती निनू सोमराज, उप वनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयोजन यशस्वी करण्यात आले.
या उपक्रमाविषयी समाधान पाटील यांनी सांगितले की, “हवामान ढगाळ असूनही निसर्गप्रेमींचा उत्साह कायम होता. अचानक बदललेल्या वातावरणामुळे प्राण्यांचे वर्तन नव्या पद्धतीने समजून घेण्याची संधी मिळाली.”
या उपक्रमामुळे जैवविविधतेची माहिती मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित झाले.




