चंद्रपूर : जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या योजनेवर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. घुग्घूस येथे महावितरणच्या कार्यालयात स्मार्ट मीटरसंबंधीची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसने या योजनेला विरोध दर्शवत 9 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
काँग्रेसचे म्हणणे आहे की, निवडणुकीपूर्वी सरकारने स्मार्ट मीटर लागू न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुकांनंतर सरकारने पुन्हा गुपचूपपणे ही योजना राबवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चंद्रपूरसारख्या औद्योगिक जिल्ह्यात, जिथे मोठ्या प्रमाणावर कष्टकरी व गरीब वर्ग राहतो, स्मार्ट मीटरमुळे वीज बिल भरण्याची प्रक्रिया अधिक कठीण होईल, असा काँग्रेसचा आरोप आहे.
विशेषतः, स्मार्ट मीटरद्वारे मोबाईल रिचार्जप्रमाणे वीज बिल भरण्याच्या पद्धतीमुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा वाढणार आहे, तसेच वीजप्रयोगावर नियंत्रण आणून अनावश्यक शुल्क लादले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
काँग्रेसने स्मार्ट मीटर योजना चंद्रपूर जिल्ह्यात रद्द करण्याची मागणी केली आहे. या याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, रोहित डाकूर, सुनील पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.




