(प्रणयकुमार बंडी)
घुग्घुस (चंद्रपूर) : वेकोली वणी क्षेत्रातील घुग्घुस येथील अमराई वॉर्ड क्रमांक 1 मध्ये झालेल्या भूस्खलनप्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व भूस्खलनग्रस्त नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता प्रमोद महाजन मंच, आठवडी बाजार येथे सुरू झाले.
भूस्खलनग्रस्त नागरिक आणि शिवसैनिकांनी शासन व प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. त्यांचा आरोप आहे की, तीन वर्षांपूर्वी झालेल्या भीषण भूस्खलनानंतरही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
भूस्खलनग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :
वेकोलीच्या भ्रष्टाचारामुळे प्रभावित अमराई वॉर्ड क्रमांक 1 मधील 160 कुटुंबांना तात्काळ हक्काची घरे द्यावीत.
भूस्खलनात घर गमावलेल्या मडावी परिवाराला योग्य मोबदला द्यावा.
भूस्खलनग्रस्तांच्या यादीतून वगळल्या गेलेल्या 168 कुटुंबांचा पुन्हा समावेश करण्यात यावा.
उल्लेखनीय म्हणजे, 26 ऑगस्ट 2022 रोजी अमराई वॉर्डात सुमारे 50 ते 60 फूट खोल खड्डा पडल्याने मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेत गजानन रामचंद्र मडावी यांचे संपूर्ण घर खड्ड्यात कोसळले. या घटनेनंतर तब्बल तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही शासन आणि वेकोली प्रशासनाकडून कोणतीही ठोस मदत किंवा पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही.
आजच्या उपोषणात अमित बोरकर यांचा मार्गदर्शनाथ पूनम वाघमारे, उमाताई मडावी, छाया पासवान, बेबी अनिल बेसरकर, ममता बहुराशी सहभाग आहे.
या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, असा कठोर इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.




