नागपूर – पावसाळ्यापूर्वी संभाव्य पूरस्थिती व जलप्रवाह सुरळीत राहावा यासाठी नागपूर महापालिकेने युद्धपातळीवर नदी सफाई मोहीम राबवली आहे. शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी यांची व्यापक पातळीवर स्वच्छता सुरू असून, आतापर्यंत एकूण 39.04 किलोमीटर लांबीपर्यंत नद्यांची सफाई पूर्ण झाली आहे.
या अभियानादरम्यान, सुमारे 30 हजार 65 घनमीटर गाळ व कचरा हटवण्यात महापालिकेला यश आले आहे. नदीपात्रातील साचलेला गाळ काढल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार आहे, तसेच परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या पथकांनी ही मोहीम सातत्याने सुरू ठेवत स्वच्छता आणि जलवाहिन्यांचे संवर्धन हे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रशासनाने नागरिकांनी देखील यामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.




