चंद्रपूर: बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाला १० कोटी रुपयांचा कॉर्पस फंड देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या पंचाहत्तर वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचा संकल्प केला आहे, आणि आनंदवनसारख्या समाजसेवी संस्थांच्या मदतीनेच हे उद्दिष्ट साध्य करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंदवनात ५०० जणांसाठी निवासी रुग्णकेंद्र उभारण्याची घोषणा केली. तसेच रुग्णालयाला मिळणारे अनुदान प्रतिरुग्ण २,२०० वरून ६,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल, तसेच पुनर्वसनासाठीचे अनुदान २,००० वरून ६,००० रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय रवींद्र सामंत उपस्थित होते. त्यांनी दिव्यांगांसाठी देशातील पहिल्या कौशल्य विकास केंद्राची स्थापना आनंदवनात करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
या महत्त्वाच्या निर्णयांमुळे आनंदवनातील सामाजिक कार्याला अधिक बळ मिळेल आणि कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




