कोल्हापूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हयात ७ डिसेंबर पासून १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेचा शुभारंभ ७ डिसेंबर रोजी होणार असून मोहीमेचा उद्देश जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटका पर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगा विषयी जनजागृती करणे, समाजामधील क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे, जिल्हयातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र यांचेकडुन पोषण आहार कीटचे वाटप करणे हा आहे. मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणी करीता तसेच १०० दिवसीय क्षयरोग मोहीमेमध्ये सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवुन सन २०२५ पर्यंत कोल्हापूर जिल्हा क्षयमुक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्र.जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.
ते केंद्रीय स्तरावरील व्ही.सी. द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक, वैद्यकिय अधिकारी डॉ.माधव ठाकूर उपस्थित होते.
यावेळी शिंदे यांनी ज्या कार्यक्षेत्रामध्ये अधिक क्षयरुग्ण सापडले आहेत त्या जोखीमग्रस्त भागाचे मॅपिंग करावे व त्या भागातील क्षयरुग्णांच्या घरातील व्यक्ती, संपर्कातील व्यक्ती, नोकरी/व्यवसायाच्या ठिकाणावरील व्यक्ती यांचे सर्वेक्षण करावे. व क्षयरोग संशीयित व्यक्तीचे थुंकी तपासणी बरोबरच क्ष-किरण तपासणी करावी अशी सूचना केली.
१०० दिवसीय क्षयरोग मोहीम देशभरातील ३४७ निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये कोल्हापूरचा समावेश आहे. १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहीमेमध्ये जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे नि-क्षय शिबीर, एम.आय.डी.सी., अनाथाश्रम, वृद्धाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह, येथे क्षयरोग तपासणी शिबिर व स्थलांतरीत, साखर कारखाना कामगार, ऊस तोडणी कामगार, हातमाग कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तर व तालुकास्तरावर नियोजन केले आहे. सदर मोहीम राबविणे करीता सन्माननिय लोकप्रतिनिधी/सामाजीक संस्था/सामाजीक कार्यकर्ते व इतर विभाग यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक यांनी यावेळी दिली.




