Thursday, August 20, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुसच्या मार्केट लाईनमधील ऐतिहासिक तलाव बुजवण्याचा प्रयत्न; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप

(प्रणयकुमार बंडी)

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : शहराच्या मार्केट लाईन परिसरातील सुमारे १०० वर्षांहून अधिक जुना ऐतिहासिक तलाव सध्या माती व बांधकाम मलबा टाकून बुजवला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हा तलाव केवळ जलस्रोत नसून शहराच्या पर्यावरणीय संतुलनाचा महत्त्वाचा आधार मानला जातो. मात्र खासगी स्वार्थासाठी त्याचा गळा घोटला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

स्थानिक नागरिक अमित बोरकर (उबाटा) यांनी मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय घुग्घुस, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. अर्जात नमूद केल्याप्रमाणे, तलावाच्या अनेकशे चौरस फुटांवर आधीच भराव करण्यात आला असून प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप आहे.

पर्यावरण आणि जनजीवनावर घाला

तलाव बुजवल्यास होणारे परिणाम गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भूजल पातळीत मोठी घट होण्याची भीती, गणेश व देवी विसर्जनासाठी पर्यायी जागेचा प्रश्न, सिंघाडा उत्पादनासह जलाधारित रोजगार धोक्यात, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई, पावसाच्या पाण्याच्या साठवण व्यवस्थेवर विपरीत परिणाम.

“डिजिटल इंडिया” पोर्टल तसेच लेखी निवेदनाद्वारे यापूर्वीही तलावाच्या खोलीकरण व सौंदर्यीकरणाची मागणी करण्यात आली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निष्क्रियतेमुळे तलाव मालकाला अवैध भराव सुरू ठेवण्यास मोकळे रान मिळाल्याचे बोलले जात आहे.

कायद्यांचा अवमान?

तक्रारीत Environment Protection Act, 1986, Water (Prevention and Control of Pollution) Act, 1974 तसेच महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमांतर्गत तातडीने स्थळ तपासणी करून काम थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तलावावर सुरू असलेले भराव काम तात्काळ थांबवून “जैसे थे” स्थिती राखण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, पाणी पुरवठा सभापती, अभियंता आणि संबंधित तलाव मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईचीही मागणी अर्जात नमूद आहे.

जनभावनांचा उद्रेक

शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे की, “हा तलाव केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर घुग्घुसची पर्यावरणीय ओळख आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला नाही तर भविष्यातील पाणीटंचाईला तेच जबाबदार राहतील.”

घुग्घुसमध्ये यापूर्वीही प्रदूषण आणि पर्यावरणीय प्रश्नांवरून प्रशासनावर टीका झाली आहे. आता तलावाच्या प्रश्नामुळे स्थानिक राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

शासन आणि प्रशासनाने वेळेत जागे होऊन हा ऐतिहासिक जलस्रोत वाचवला नाही, तर “विकास”च्या नावाखाली पर्यावरणाची होणारी हानी ही घुग्घुसच्या भवितव्यासाठी घातक ठरेल, अशी तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News