मुंबई | महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाने मतदार यादीतील संभाव्य दुबार (डुप्लिकेट) नावांची तपासणी करून ती वगळण्याचे आदेश सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी, महानगरपालिका, नगरपरिषद व पंचायत समित्यांना दिले आहेत.
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस (29 ऑक्टोबर 2025) नोटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या तयार करताना जर कोणत्याही मतदाराचे नाव दोन ठिकाणी आढळले, तर संबंधित मतदारास नोटीस देऊन त्याची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर योग्य तपासणी करून एकच नाव मतदार यादीत ठेवण्यात येईल.
आयोगाने हेही नमूद केले आहे की, जर मतदाराचे नाव, लिंग, पत्ता किंवा छायाचित्र यामध्ये साम्य आढळले, तर त्याची पडताळणी करून चुकीची नावे वगळली जातील. अशा मतदारांना दोन ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव जगदीश मोरे यांनी सांगितले की, “मतदार यादीतील शुद्धता व अचूकता ही स्वच्छ निवडणुकीची पायाभूत अट आहे. त्यामुळे दुबार नावे वगळण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी.”
या आदेशामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार यादी अधिक स्वच्छ, अचूक आणि पारदर्शक राहणार असल्याचा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.




