कोरपना, चंद्रपुर : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोरपना तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून जमीन चिपचिप झाली असून, कापसाच्या पिकाला बोंडे धरू लागल्यावरच ती सडून काळी पडल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
कापसाला भाव नाही आणि निसर्गाची अवकृपा या दोन्ही संकटात शेतकरी सापडले आहेत. सोयाबीन शेंगा भरल्या नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवून शेतातील सोयाबीन पिकाची सफाई करण्याची नामुष्की ओढवली आहे. मिरचीला भाव नसल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी मिरची पिकाला पाठ फिरवली, तर तुरीचे पिक उभे असून तेही सुकण्याच्या स्थितीत आहे.
दरम्यान, नदीकाठावर तिनवेळा पूरपरिस्थिती निर्माण होऊन पंचनामे करण्यात आले असले तरी संपूर्ण कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिद अली यांनी केली आहे.
सोनुर्ली परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक पाण्याखाली जाऊन पूर्णतः नष्ट झाले असून, शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफी आणि नुकसानभरपाईच्या अपेक्षेने शासनाकडे डोळे लावून बसले आहेत.





